Sebi New Rules 2026 : गुंतवणूकदारांना त्यांच्या भविष्यातील उद्दिष्टांपर्यंत सुलभतेने पोहोचवण्यासाठी शेअर बाजार नियामक 'सेबी'ने म्युच्युअल फंड नियमावलीत आमूलाग्र बदल केले आहेत. यानुसार, आता पारंपरिक 'रिटायरमेंट' आणि 'चिल्ड्रन्स' फंड्स बंद करून त्याऐवजी अधिक शास्त्रीय आणि प्रगत अशा 'लाईफ सायकल फंड्स'ची सुरुवात करण्यात आली आहे.
राधिका गुप्तांकडून स्वागत
एडलवाईस म्युच्युअल फंडच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी सेबीच्या या निर्णयाचे ऐतिहासिक बदल म्हणून वर्णन केले आहे. त्यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर म्हटले की, "हा बदल भारतीय मालमत्ता व्यवस्थापनासाठी एक 'डिफाईनिंग शिफ्ट' आहे. लाईफ सायकल फंडमुळे गुंतवणूकदारांना बाजारातील चढ-उतारांची चिंता न करता भविष्यातील आर्थिक नियोजन करण्याची संधी मिळेल."
काय आहे 'लाईफ सायकल फंड' आणि तो कसा काम करतो?
हे फंड 'ओपन-एंडेड' असतील, पण त्यांची मुदत आधीच ठरलेली असेल. या फंडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'ग्लाईड पाथ' दृष्टिकोन. गुंतवणुकीच्या सुरुवातीच्या वर्षांत हा फंड इक्विटीसारख्या जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये मोठी गुंतवणूक करेल. जशी मॅच्युरिटी जवळ येईल, तसा पोर्टफोलिओ आपोआप सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'डेट' फंडाकडे वळवला जाईल. यामुळे गुंतवणूकदाराला स्वतःहून पोर्टफोलिओ बदलण्याची किंवा मार्केटच्या टायमिंगची काळजी करण्याची गरज उरणार नाही.
Over the last few years, SEBI has meaningfully expanded what asset managers can do. Debt passive regulations, Specialised Investment Funds, and now Life Cycle Funds are good examples. These aren’t cosmetic changes, rather they widen the solution set. It’s genuinely one of the…
— Radhika Gupta (@iRadhikaGupta) February 26, 2026
५ ते ३० वर्षांपर्यंतचे पर्याय
सेबीच्या परिपत्रकानुसार, फंड हाऊसेस ५ वर्षांच्या पटीत हे फंड लाँच करू शकतील. किमान ५ वर्षे ते कमाल ३० वर्षांपर्यंत हे फंड उपलब्ध असतील. या फंडात इक्विटी, डेट, InvITs, सोने आणि चांदीचे ETF यांचा समावेश असेल. जर एखाद्याला मुलाच्या शिक्षणासाठी १५ वर्षांनंतर निधी हवा असेल, तर तो १५ वर्षांचा लाईफ सायकल फंड निवडू शकतो.
वाचा - कोण आहेत रुओमिंग पँग? ज्यांच्यासाठी अॅपल, मेटा आणि ओपनएआयमध्ये 'पॅकेज युद्ध' अखेर कोण जिंकलं?
निवृत्ती आणि चिल्ड्रन्स फंड का बंद झाले?
गुंतवणूकदारांमधील संभ्रम दूर करण्यासाठी सेबीने हे पाऊल उचलले आहे. या श्रेणीतील जुन्या स्कीम्समध्ये आता नवीन गुंतवणूक स्वीकारली जाणार नाही. अस्तित्वात असलेल्या योजना समान स्वरूपाच्या इतर योजनांमध्ये विलीन केल्या जातील. नावापेक्षा कामावर आधारित आणि संरचनेनुसार उद्दिष्ट पूर्ण करणारे 'प्रोडक्ट' गुंतवणूकदारांना देणे, हा यामागचा हेतू आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
